"रावे" कार्यक्रमांतर्गत विदयार्थी करणार तंत्रज्ञान प्रसार
कृषी महाविद्यालय गोळेगाव अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) उपक्रमाच्या उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० जून २०१८ रोजी करण्यात आले. सातव्या सत्राचे ५० कृषिदुत व कृषिकन्या औंढा नागनाथ तालुक्यामधील माथा या गावामधील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान पोहचविणार आहेत. उपरोक्त कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे गट बनविण्यात आले आहेत. या गावांमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रसाराबरोबरच शेतकऱ्यांचे अनुभव आणि समस्या जाणून घेणार असल्याची माहिती सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिली.
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थाना शेतकरी जीवनाची ओळख व्हावी, त्यांच्या अडीअडचणी समजाव्यात, तसेच नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकरयांपर्यंत पोहंचवता यावे यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबिवला जातो. या अंतर्गत विद्यापीठातील वसमत येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्राचे तज्ज्ञदेखील मार्गदर्शन करणार आहेत.
यंदा विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध विषयांवरील मोबाईल ऑप्सच्या वापराबाबत कृषिदुत व कृषिकन्या शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. या पूर्ण सत्रामध्ये कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी संबंधित विभागातील कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी उद्योगांना भेटी देणार आहेत. याशिवाय बीजप्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण,तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन, गट चर्च्या, शेतकरी मेळावा, व्याखाने आणि शीवारफेरीचे आयोजन करणार आहेत.
शेतकरयांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुकुटपालन आदी विषयावर तज्ज्ञ गावात जाऊन माहिती देणार आहेत असे डॉ. देवसरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमांतर्गत डॉ. विद्यानंद मनवर, कार्यक्रम अधिकारी यांनी रावे कार्यक्रमाची रुपरेशा विशद केली. या कार्यक्रमादरम्यान डॉ. सुनील उमाटे, सहयोगी प्राध्यापक, श्री. नारायण कुऱ्हाडे, सहयोगी प्राध्यापक, डॉ. हरीश आवारी, सहयोगी प्राध्यापक, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. फरिया खान, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. श्रुती वानखेडे डॉ. अभय जाधव, श्री. महेश तनपुरे या विषय तज्ञांनी संबंधित विषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थाना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.